११ डिसेंबरः आजचा इतिहास 

११ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ११ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

मुत्सद्दी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (जन्म १९३५)

काँग्रेसचे संकटमोचक असलेल्या प्रणव मुखर्जी यांना पक्षाने २०१२ मधे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभं केलं. आणि पंतप्रधान पदासाठीचे काँग्रेसमधले सगळ्यात तगडे उमेदवार असलेल्या प्रणवदांना राष्ट्रपतीपदावरच समाधान मानावं लागलं. प्रवणदांना राष्ट्रपती करून काँग्रेसमधल्या एका गटाने आपल्या वाटेतला अडथळा दूर केल्याची चर्चा अजूनही वेळोवेळी होते. राष्ट्रपती होण्याआधी प्रवणदा संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम केलंय.

काही महिन्यांपूर्वी संघाच्या व्यासपीठावर जाण्याच्या त्यांच्या निर्णयाची उलटसुलट चर्चा झाली. १९६९ मधे काँग्रेसने त्यांची राज्यसभेवर निवड केली. ती त्यांच्या राष्ट्रीय राजकारणाची सुरवात होती. ते इंदिरा गांधींचे कट्टर समर्थक होते. त्यानंतर १९७५, १९८१, १९९३ आणि १९९९ मधे ते राज्यसभा सदस्य होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या समर्थकांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ दिला नाही. काही काळासाठी त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टीही झाली. नंतर राजीव गांधींसोबतच्या वाटाघाटीनंतर आपला ‘राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस’ पक्ष काँग्रेसमधे विलीन केला. पुढे सोनिया गांधींना काँग्रेस अध्यक्ष बनवण्यात मुख्य भूमिका निभावताना त्यांनी गांधी घराण्याचा निष्ठावंत म्हणून आपलं स्थान बळकट केलं. 

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार (जन्म १९२२) 

दिलीप कुमार, राज कपूर आणि देवानंद ही हिंदी सिनेमाची त्रिमूर्ती. त्यात दिलीप कुमार इतर दोघांसारखे ना डायरेक्टर होते, ना प्रोड्युसर. तरीही फक्त आणि फक्त अभिनयाच्या जोरावर ते सर्वोत्कृष्ट मानले गेले. भारतीय सिनेमातला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा मान आजही त्यांच्याच नावावर आहे. 

१९४४मधे दिलीप कुमारचा ज्वार भाटा हा पहिला सिनेमा आला. किला हा शेवटचा सिनेमा आला १९९८मधे. या ५४ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अवघे ६०-६५ सिनेमे केले. पण त्यातल्या निम्म्याहून जास्त सिनेमांनी सिनेसृष्टीवर आपला ठसा उमटवला. त्यांच्या अभिनयाच्या प्रभावातून सुपरस्टार अमिताभ बच्चनपासून शाहरूख खानपर्यत कुणीही सुटू शकलं नाही. पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि निशान ए पाकिस्तान हे पुरस्कार त्यांच्या थोरवीची साक्ष देतात. आज ते ९६वा वाढदिवस साजरा करत आहेत. इतक्या उतारवयात त्यांच्या तब्येतीच्या बातम्या ब्रेकिंग न्यूज आणि पहिल्या पानावरच्या बातम्या बनतात. ते आजही आऊटडेटेड झालेले नाहीत, हे अधोरेखित होत राहतं.

संघ बदलवणारे बाळासाहेब देवरस (जन्म १९१५)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऑर्गनायझेशन या पहिल्याच पायरीवर अनेक वर्षं अडकून पडलेला असताना माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनीच संघाला मोबिलायझेशन आणि अॅक्शन या पुढच्या पायऱ्यांपर्यंत हाताला पकडून नेलं. या पायऱ्या त्यांनीच सूचवल्या होत्या. संघ समाजापासून फटकून राहत असल्यामुळे गोळवलकर गुरुजींशी मतभेद होऊन ते संघापासून दूरही झाले होते. 

१९६५ला सरकार्यवाह झाल्यानंतर त्यांनी संघाला त्यांच्या पद्धतीने घडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ते १९७३ला सरसंघचालक बनल्यानंतर तर संघ वेगाने बदलायला लागला. अस्पृश्यता आणि जातीयतेवर केलेला प्रहार त्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. शाखेत अडकलेल्या संघाला त्यांनी राजकारण, शिक्षण, उद्योग, बँका, समाजकारण, धर्मजागृती, कामगार युनियन, दलित, आदिवासी, मीडिया अशा क्षेत्रात आणलं. त्यांच्यामुळेच संघ आणीबाणीविरोधी आंदोलनात उतरला. त्यातून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांत पसरला. त्यांनी त्यांच्या निधनाआधी अटलबिहारी वाजपेयी या संघप्रचारकांना पंतप्रधान झालेलं पाहिलं. त्यांच्यानंतर राजेंद्रसिंह हे अमराठी आणि ब्राह्मणेतर सरसंघचालक होऊ शकले, हे देवरसांनी बदलवलेल्या संघाचंच फलित होतं. 

आठवा स्वर एम. एस. सुब्बलक्ष्मी (निधन २००४)


`मी कोण? मी एक साधा पंतप्रधान या राणीसमोर. ही सुरांची राणी आहे`, हे उद्गार आहेत पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे. त्यांनी वर्णन केलेली सुरांची राणी म्हणजे भारतरत्न एम. एस. सुब्बलक्ष्मी. उस्ताद बडे गुलाम अली खां साहेबांनी त्यांचं वर्णन सुस्वरलक्ष्मी असं केलं होतं. किशोरी आमोणकरांनी त्यांना सात सुरांच्या पल्याड असणारा आठवा स्वर म्हटलं होतं. लता मंगेशकर त्यांना तपस्विनी म्हणत.

विशेष म्हणजे लता मंगेशकर आणि किशोरी आमोणकर या भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेणाऱ्या गायिकांप्रमाणेच एम. एस. सुब्बलक्ष्मीही देवदासी समाजातच जन्माला आल्या होत्या. त्यांनी कर्नाटक शास्त्रीय संगीताला वेगळी ओळख मिळवून दिली. सेवासदनम, मीराबाई असे क्रांतिकारक ठरलेले सिनेमे देऊनही त्या सिनेमात रंगल्या नाहीत. शास्त्रीय संगीत हाच त्यांचा प्रांत होता. त्यांनी गायलेली भजनं आणि स्तोत्र आजही लोकप्रिय आहेत. त्या त्यांच्या मैफिलींची सुरवात संत तुकारामांच्या भजनाने करत. आपल्या प्रतिभेच्या जोरावर संगीतालाच उंची मिळवून देण्याचं काम सुब्बलक्ष्मींनी केलं.

६४ घरांचा राजा विश्वनाथन आनंद (  जन्म १९६९)

भारतात बुद्धिबळाची क्रेझ आणणारे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचा आज ४९ वा वाढदिवस. आनंद यांनी पाच वेळा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकलीय. १९८८ मधेच त्यांनी ग्रॅँडमास्टरचा किताब पटकावला. २००२, २००७, २००८, २०१० आणि २०१२ मधे त्याने जगज्जेतेपद पटकावलं. बुद्धिबळातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना १९९२ मधे पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. २००७ मधे त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. एवढंच नाही तर स्पेन सरकारनेही देशाचा सर्वोच्च पुरस्कार जॅमिओ दे ओरो देऊन आनंदचा गौरव केला. बुद्धिबळाचा शोध लावणाऱ्या भारतात बुद्धिबळाला लोकप्रियता मिळवून देण्याचं काम आनंद यांनी केलं.