१० डिसेंबरः आजचा इतिहास

१० डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १० डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

सर जदुनाथ सरकार (जन्म १८७०) 

सर्वश्रेष्ठ भारतीय इतिहासकार म्हणून गौरवलेले जदुनाथ सरकार यांनी भारतीय इतिहासलेखनाला नवी दिशा आणि शिस्त लावली. स्वातंत्र्यानंतर मार्क्सवादी आणि पोस्ट मॉडर्निस्ट इतिहासकारांच्या प्रभावामुळे जदुनाथ सरकारना त्याचं श्रेय पुरेसं दिलं नाही. तरीही त्यांनी आधुनिक भारतीय इतिहासाची केलेली पायाभरणी कुणीही नाकारू शकलेलं नाही. ब्रिटिश सरकारने त्यांना नाईटहूडचा सन्मान दिला.

दीर्घकाळ इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या जदुनाथ सरकार कलकत्ता युनिवर्सिटीचे कुलगुरूही होते. मुगलांचा विशेषतः औरंगजेबाचा इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्याचा त्यांनी विविध अंगांनी सविस्तर आढावा घेतला. ते करतानाच त्यांना छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाने आकर्षून घेतलं. त्यावर त्यांनी पुस्तकंही लिहिली. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासाकडे देशाचं लक्ष वेधलं गेलं.

अखेरचे गवर्नर सी. राजगोपालाचारी (जन्म १८७८)

ब्रिटिश सत्तेचा भारतातला प्रमुख हा गवर्नर जनरल असायचा. स्वातंत्र्यानंतर नवी राज्यघटना स्वीकारण्यापर्यंतच्या दोन वर्षांच्या काळात शेवटचे गवर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी हे देशाचे घटनात्मक प्रमुख होते. सर्वोच्च पदावर असतानाही स्वतःचे कपडे स्वतः धुणारे निस्पृह विद्वान म्हणून त्यांच्याविषयी देशभर आदराची भावना होती. तरीही त्यांना राष्ट्रपती बनवायला विरोध झाला. कारण त्यांनी चले जाव आंदोलनाला विरोध केला होता. 

काँग्रेस पक्षात राहूनही राजाजी कायम स्वतंत्र भूमिका घेत राहिले. महात्मा गांधी त्यांना म्हणूनच माझ्या विवेकाचा रखवालदार म्हणत. पण इतरांकडून त्यांच्या या भूमिकेवर टीका होत राहिली. देशाचं सर्वोच्च पद भूषवल्यावरही केंद्रात बिनखात्याचे मंत्री, गृहमंत्री आणि नंतर तर मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री बनण्यात त्यांना चुकीचं वाटलं नाही. सर्वोच्च भारतरत्न मिळाल्यानंतरही त्यांनी अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कारही स्वीकारला. दीर्घकाळ काँग्रेसमधे मोठमोठ्या पदांवर राहिल्यानंतर त्यांनी उजव्या विचारधारेची स्वतंत्र पार्टी काढली. त्यांनी दक्षिणेत काँग्रेसचा पाया रचला आणि १९६७च्या विधानसभा निवडणुकीत बिगरकाँग्रेसवादाचाही. एकीकडे ब्राह्मणी विचारधारेचे म्हणून टीका झालेले राजाजी द्रविड पक्षांना सत्ता मिळवून देण्यात कारण ठरले. ते दलित मंदिरप्रवेशाच्या आंदोलनात आघाडीवर होते तरीही कायम ब्राह्मणी वर्चस्ववादी हिंदूंचे प्रतिनिधी मानले गेले. ते स्वातंत्र्यापूर्वी हिंदी आणि संस्कृतचे समर्थक होते आणि स्वातंत्र्यानंतर हिंदीविरोधी आंदोलनांचे नेते बनले. ९४ वर्षांच्या दीर्घ आयुष्यात अनेक विरोधाभास असूनही देशाच्या जडणघडणीत राजकीय नेते, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, लेखक, अनुवादक म्हणून राजाजींचं योगदान अत्यंत महत्त्वाचंच होतं. 

शुद्धनिषाद श्रीकांत ठाकरे (निधन २००३) 

शिवसेनेच्या जडणघडणीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सर्वात मोठं योगदान कुणाचं असेल तर ते त्यांचे छोटे भाऊ श्रीकांत ठाकरे यांचं. शिवसेना घडवणाऱ्या मार्मिकमधे तर त्यांनी आपल्या आयुष्याची पंचवीस वर्षं ओतली. पण त्यांचं काम कायमच पडद्याआड राहिलं. प्रबोधनकार ठाकरे यांचा मुलगा, बाळासाहेबांचे भाऊ आणि राज ठाकरेंचे वडील ही त्यांची लोकप्रिय ओळख बनली. पण त्यांचं काम त्याच्याही पलीकडे फार मोठं होतं.  

संगीतकार म्हणून श्रीकांतजींनी मराठीला फ्रेशनेस दिला. महंमद रफी फक्त त्यांच्यासाठीच मराठी गाणी गायले. ती सगळीच प्रचंड गाजली. उर्दूचा त्यांचा अभ्यास होता. त्यांनी मराठीला गझलची ओळख करून दिली. बन्याबापू या नावाने त्यांनी काढलेली व्यंगचित्रंही खूप गाजली. मार्मिकचं संपादन करताना अनेक लेखक पत्रकार घडवले. मार्मिकच्या शेवटच्या पानावर ते शुद्धनिषाद नावाने सिनेमावर लिहित. त्यांची स्वतःची एक अत्यंत वाचनीय शैली होती. त्याची कॉपी करून अनेक कॉलमिस्ट गाजले. श्रीकांतजींच्या त्या बेधडक शैलीचा प्रभाव मराठीतल्या सिनेमाविषयक लिखाणावर आहे. 

एक दुजे के लिए रती अग्निहोत्री (जन्म १९६०) 

उत्तर प्रदेशातल्या पंजाबी कुटुंबात जन्मलेली रती अग्निहोत्री लहानाची मोठी झाली ती मद्रासमधे. वयाच्या १९व्या वर्षी तिचा पहिला तामिळ सिनेमा पुथिया वारपुगल सुपरहिट ठरला. पुढच्या तीन वर्षांत तिने ३२ सिनेमे केले. उत्तर भारतीय रती स्वतःला तामिळ मानायची. त्यामुळेच एक दुजे के लिए हा तिच्यासाठी परफेक्ट सिनेमा होता. उत्तर भारतीय सपना आणि दक्षिण भारतीय वासूची ही लवस्टोरी प्रचंड गाजली. या एका सिनेमाने रतीला सुपरस्टार बनवलं. नंतर तिने १९९०पर्यंत मोठमोठ्या हिरोंबरोबर अनेक सिनेमे केले. लग्नानंतर ती गायब झाली. २००१ मधे तिने पुनरागमन केलं. पण एक दुजे के लिए ची जादू ती पुन्हा कधीच करू शकली नाही.