१ डिसेंबर: आजचा इतिहास

०१ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

आचार्य काका कालेलकर (जन्म १८८५)

सध्या देशभरात आरक्षणाच्या निमित्ताने मागास वर्ग आयोगाची चर्चा सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर सहाच वर्षांनी १९५३ मधे पहिला 'मागासवर्गीय आयोग' नेमण्यात आला. या आयोगाने १९५५ साली आपला अहवाल सरकारला दिला. दलित आणि अस्पृश्यांसाठी कल्याणकारी योजनांची शिफारस केली. या आयोगाचे अध्यक्ष होते थोर स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी विचारवंत, हिंदीचे कैवारी, पत्रकार काकासाहेब कालेलकर. आज त्यांचा जन्मदिवस. दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर हे त्यांचं मूळ नाव. काकासाहेबांनी पुण्यात शिक्षण झाल्यावर राष्ट्रमत दैनिकाच्या संपादकीय विभागात काम केलं. बडोद्याच्या गंगाधर विद्यालयात शिक्षक म्हणून कामाला लागले. पण ब्रिटीशांनी शाळेत सरकारविरोधी कारवाया चालतात असं सांगत काही काळातच ही शाळा बंद पाडली. त्यानंतर ते गांधीजींच्या साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. गांधींजींच्या 'सर्वोदय' नियतकालिकाचे संपादक झाले. 

मूळचे कर्नाटकातल्या कारवारचे, साताऱ्यात जन्मलेले आणि गुजरातेत राहिलेल्या काकासाहेबांनी हिंदीच्या प्रचार प्रसारात स्वतःला झोकून दिलं. राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी राष्ट्रभाषा व्हावी म्हणून त्यांनी भारतभर दौरे केले. 'स्मरण-यात्रा', 'धर्मोदय' या दोन आत्मचरित्रांसह, 'हिमालयनो प्रवास', 'लोकमाता', 'जीवननो आनंद', 'अवरनावर' यासारखी प्रवासवर्णन, निबंधसंग्रह त्यांनी लिहले. जवळपास ३० पुस्तक लिहणाऱ्या काकासाहेबांनी स्वतःच आपल्या पुस्तकांचा वेगवेगळ्या भारतीय भाषांमधे अनुवाद केला. इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती अशा भाषांमधून त्यांनी लेखन केलं. गुजरातीला आधुनिक भाषा म्हणून रूप देण्यात त्यांचं योगदान महत्त्वाचं होतं. २१ ऑगस्ट १९८१ मधे त्यांचं निधन झालं.

नर्मदेसाठी झटणाऱ्या मेधा पाटकर

सामाजिक कार्यकर्त्या, 'नर्मदा बचाओ आंदोलन'च्या संस्थापक मेधा पाटकर यांचा आज जन्मदिवस. नर्मदा बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी विकासाच्या संकल्पनेलाच आव्हान देत शाश्वत विकासाची चळवळ उभी केली. नर्मदा नदी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधे वाहत जाऊन समुद्राला मिळते. या नदीतच सरदार सरोवर बांधल्यामुळे हजारो लोकांना बेघर व्हावं लागलं. या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लावून धरणाऱ्या मेधा पाटकरांना यासाठी अनेकदा जेलमधे जावं लागलं. यासोबतच पर्यावरणाचा मुद्दाही ऐरणीवर आला.

मुंबईत जन्मलेल्या मेधा पाटकर यांनी टाटा समाजविज्ञान संस्थेतून पदवी घेतली. कामगार संघटनेत असलेल्या वडलांकडूनच त्यांना चळवळीचा वारसा मिळाला. पीएचडी अर्ध्यावर सोडूनच त्यांनी नर्मदा खोऱ्यातल्या आदिवासांच्या पुनर्वसन आंदोलनात उडी घेतली. आज नर्मदा बचाव आंदोलन हे स्वतंत्र भारतातलं एक महत्त्वाचं आंदोलन झालंय. पाटकरांचं हे काम देशपरदेशातही नावाजलं गेलंय. देशभरात छोटी छोटी अनेक आंदोलन सुरू असतात. छोट्या अस्तित्वामुळे त्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. हे ओळखूनच राष्ट्रीय जनआंदोलन समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या त्या संस्थापक आहेत. १९९१ मधे त्यांना राइट लाइवलीहुड अवॉर्ड मिळाला होता.

नवकविता जनक बा. सी. मर्ढेकर (जन्म १९०९)

मराठीतले युगप्रवर्तक कवी, नवकविता, नवटीकेचे जनक बा. सी मर्ढेकर यांचा आज जन्मदिवस. अभंग आणि ओवी या काहीशी जुन्या, लोप पावत गेलेल्या काव्यप्रकारातून मर्ढेकरांनी आपली कविता सादर केली. १९३९ मधे त्यांचा ‘शिशिरागम’ हा पहिला कवितासंग्रह आला. यावर रविकिरण मंडळातल्या माधव ज्युलियन यांच्या कवितेचा प्रभाव होता. पण यानंतर १९४७ मधे ‘काही कविता’ (१९४७), आणि १९५१ मधे ‘आणखी काही कविता’ या संग्रहांनी मराठीला नवकवितेचा प्रवाह मिळाला. औद्योगिक क्रांतीनंतरचे यंत्रयुग आणि महायुद्धोत्तर जगातल्या भेदक वास्तवाचे दर्शन मर्ढेकरांनी आपल्या कवितेतून घडवले. मानवी जीवनाच्या अर्थशुन्यतेची प्रचीतीच या कवितांतून मराठी वाचकांना झाली. 

परंपरागत सांकेतिक उपमान आणि प्रतिमा न वापरता त्यांनी यंत्रयुगातल्या प्रतिमांचा चपखलपणे वापर केला. लंडनला जाऊन शिकून आल्यावर मर्ढेकर ‘टाइम्स ऑफ़ इंडिया’मधे सहसंपादक झाले. सरकारी कॉलेजातल्या प्राध्यापकीही ते रमले नाहीत. आकाशवाणीतली नोकरी मात्र त्यांनी निवृत्तीपर्यंत केली. मर्ढेकरांनी कवितेसोबतच रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी या कादंबरऱ्या लिहिल्या. नाटक, संगीतिका हे साहित्यप्रकारही हातळले. आर्ट्‌स अँड मॅन, वाङ्मयीन महात्मता, टू लेक्चर्स ऑन ॲन अस्थेटिक ऑफ लिटरेचर, सौंदर्या आणि साहित्य हे त्यांचे समीक्षाग्रंथ गाजले. २० मार्च १९५६ ला त्यांचं निधन झालं.

मेणाच्या जादूगार मादाम तुसा (जन्म १७६१)

मेणाचे पुतळे बनवणाऱ्या महान फ्रेंच कलाकार मादाम तुसा यांचा आज जन्मदिवस आहे. मेरी ग्रोशोल्ज हे त्यांचं मूळ नाव. टीवी आणि सिनेमाची सोय नसलेल्या त्या काळात थोर व्यक्ती कशा दिसातात, हे अनेकांना कळायचे नाही. मादाम यांनी अनेक थोर व्यक्तींचे मेणाचे हुबेहुब पुतळे साकारले. हे पुतळे बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी व्हायची. डॉ. फिलिप कर्टियस यांच्याकडून त्यांनी मेणापासून पुतळे बनवण्याचे धडे गिरवले. मादाम यांनी १७७७ मधे पहिल्यांदाच फेंच तत्त्वज्ञ वॉल्टेअर यांचा पुतळा बनवला होता.

फ्रेंच राज्यक्रांतीतून कशाबशा वाचलेल्या मादाम यांनी आपल्या कलाकौशल्याचं लंडन इथं प्रदर्शन भरवलं. आज हे प्रदर्शन मादाम तुसा वॅक्स म्युझियम म्हणून जगप्रसिद्ध आहे. १६ एप्रिल १८५० मधे त्यांच्या मृत्यूनंतरही मेणाच्या पुतळ्यांचं हे प्रदर्शन सुरुच राहिलं. आता नवनवे कलाकार इथं येऊन प्रसिद्ध लोकांचे पुतळे बनवतात. या सगळ्या कलाकृतींमुळे हे संग्रहालय लंडन शहरातलं एक प्रमुख आकर्षणाचं केंद्र बनलंय.

मिस्टर युनिवर्स प्रेमचंद डोग्रा (जन्म १९५५)

नव्वदच्या दशकात सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांनी जगात भारतीय सौंदर्याला सर्वोच्च स्थानावर नेलं होतं. विश्वनाथन आनंद पहिला ग्रँडमास्टर बनून भारतीय बुद्धिमत्तेची चुणूक जगाला दाखवून दिली होती. त्याआधी प्रेमचंद डोग्रा यांनी १९८८ ला बॉडीबिल्डिंग स्पर्धेत मिस्टर युनिवर्स किताब मिळवला होता. आणि ते संपूर्ण देशभराच्या अभिमानाचा विषय बनले. 

पंजाबमधल्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यात बॉडी बिल्डिंगसारख्या खेळात यश मिळवणं सोपी गोष्ट नव्हती. पण या पैलवानाने ते करून दाखवलं. त्यांचं शरीर खरंच सुडौल होतं. त्यात दिखाऊपणा नव्हता. उलट निर्मळ सौष्ठव होतं. त्यला सात्विक चेहऱ्याची जोड होती. त्यामुळे मिस्टर पंजाबपासून सुरू झालेली त्यांची दौड मिस्टर युनिवर्सपर्यंत जाऊन पोचली. ९ वेळा मिस्टर इंडिया, ८ वेळा मिस्टर आशिया आणि १९८८ ला ८० किलो वजनी गटात मिस्टर युनिवर्स हे त्यांच यश फारच मोठं होतं. त्यामुळे ते देशभरातल्या तरुणांचे आदर्श बनले. देशभरातल्या जिममधे आणि घरांमधेही त्यांचे पोस्टर लागले. पुढे त्यांना पद्मश्री, अर्जुन पुरस्कार आणि या क्षेत्रातलं मानाचं अचिवमेंट मेडलही मिळालं. आजही ते होशियारपूर शहरातल्या एका जिममधे मुलांना शांतपणे प्रशिक्षण देण्याचं काम करतात.