सुषमा अंधारेः माझा बाप संविधान लिहायचा

०८ मार्च २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख.

उस्मानाबादमधल्या दुर्गम खेड्यातला १९७६चा तिचा जन्म. तिच्या लहानपणी सरकारी शाळेत स्वातंत्र्यदिनाचा मोठा समारंभ व्हायचा. १५ ऑगस्टला सगळी पोरं-पोरी स्वच्छ गणवेश घालून शाळेच्या आवारात जायची. कार्यक्रम संपला की वर्गातली सगळी पोरं एका हातात झेंडा आणि दुसऱ्या हातात त्यांच्या बापाचा हात धरून घरी परत जायची. ती तिच्या हातांकडे पहायची.

तुमचे वडील काय करायचे?

तिच्या एका हातात तिरंगा असायचा पण दुसऱ्या हात तिच्याच वयाच्या तिच्या मावसभावाच्या हातात असायचा. ‘इतर मुलांच्या हातात असतो तसला कणखर हात माझ्या हातात का नाही? माझे बाबा मला घ्यायला का येत नाहीत?’ तिला गलबलून यायचं. पुढे ती मोठी होत गेली, तेव्हाही कुणी तुझे वडील काय करतात असं कुणी विचारलं की धाय मोकलून रडावंसं तिला वाटायचं. आपला बाप आपल्याला आजोबांकडे टाकून गेला, याचं दुःख तिच्यासाठी शब्दात मांडता न येणारं होतं.

आता तिला सगळे सुषमाताई म्हणून ओळखतात. महाराष्ट्रातल्या गावागावात त्यांची ओळख जाऊन पोचलीय. आता तुमचे वडील काय करायचे, असं त्यांना कुणी विचारलं तर त्या हलकंच हसतात आणि अभिमानाने सांगतात, ‘माझा बाप संविधान लिहायचा. माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी धडपडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाच माझा बाप आहे.’ ही भीमकन्या म्हणजे महाराष्ट्राच्या समाजकारण, राजकारणातलं एक तडफदार व्यक्तिमत्त्व सुषमा अंधारे.

आजोबांच्या रूपात कबीर भेटला

सुषमाताईंचं जन्मगाव पाडोली. जन्मदाते वडील दत्ताराव गुत्ते. त्यांचा समाज वंजारी. दोन लग्न करून दोघींचीही कूस उजवली नाही म्हणून त्यांनी कोल्हाट्याची पोर घरात आणली. तिच्याकडून दत्तारावांना मुलगी झाली. सहाजिकच दत्तारावांनी तिला टाकलं. शेवटी सुषमाताईंच्या आजोबांनी तिला आपल्याकडेच ठेवून घेतलं आणि तिची सगळी जबाबदारी उचलली.

शाळेत नाव घालण्याची वेळ आली तेव्हा बापाचं नाव लावायचं होतं. सुषमाताईंच्या आजोबांनी बापाच्या जागी स्वतःचंच नाव लावलं. सुषमा दगडू अंधारे. अनेकजण  त्यांना हे नाव बदलून घ्यायचा सल्ला देतात. पण त्या सांगतात, ‘मला या नावाचा सार्थ अभिमान वाटतो. माझे आजोबा कधीही शाळा शिकलेले नाहीत. पण ते आम्हाला नेहमी कबिराचे दोहे ऐकवायचे. त्यांना असंख्य दोहे पाठ होते. जात पंचायतीतही ते या दोह्यांचे दाखले द्यायचे,’

आजोबांच्या रूपानं कबीरच त्यांच्यासोबत वावरत होता. या कबिराच्या संस्कारात सुषमा ताईंचं बालपण गेलं. पुढे त्यांनी राजकारणात मात्र बाबासाहेबांच्या बुद्धाची वाट धरणं कबिराच्या संस्कारांना धरूनच होतं.

हेही वाचा : बड्डे गर्ल हरमनप्रीत: बदलत्या इंडियाची डॅशिंग कॅप्टन

विलासरावांमुळे राजकारणाचा सेन्स मिळाला

सुषमाताईंचं गाव इतकं दुर्गम होतं की त्यांचं ग्रॅज्युएशन सुरू होईपर्यंत गावात लाईटही आली नव्हती. शेवटी बीए कऱण्यासाठी त्या लातूरल्या गेल्या. तिथल्या सरकारी हॉस्टेलमधे त्यांना ऍडमिशन मिळाली नाही आणि खासगी हॉस्टेलमधे भरण्याइतके पैसे नव्हते. तरी याला त्याला भेटून त्यांनी खासगी हॉस्टेलवर जागा मिळवली. घराच्या चार भिंतीमधून बाहेरच्या जगात आल्यावर जातवादाचे चटके त्यांना बसू लागले.

लातूरला त्या बीए करत होत्या ते कॉलेज विलासराव देशमुखांचं होतं. १९९९ मधे विलासराव मुख्यमंत्री झाले, तेव्हा विलासरावांनी राजकारणाचा काहीही गंध नसलेल्या या होतकरू मुलीला ग्रामीण प्रचाराची सगळी व्यवस्था सोपवली. विलासरावांनी सांगितलेला प्रचार करायचा आणि त्या बदल्यात आर्थिक मदत मिळायची. पण या सगळ्यामुळे त्यांना राजकारणाचा एक सेन्स मिळाला.

आम्ही बिनचेहऱ्याची माणसं

सुषमाताई सांगातात, ‘या सगळ्यात काम करताना मला एक गोष्ट लक्षात आली. इथं मेंदू शोषणाचा सिद्धांत वापरला जातो. बेरोजगार तरुणांना राजकीय नेते अक्षरशः वापर करून घेतात. उदाहरणच द्यायचं झालं तर कोणत्याही राजकीय पक्षाचा बॅनर लावणारा, पत्रकं वाटणारा असा कार्यकर्ता पाहुया. त्यांच्यात कुलकर्णी, देशपांडे, ललवाणी, भुतडा, अशा आडनावाचं कुणीही दिसणार नाही. मग ग्राऊंडवर काम करणारा कार्यकर्ता कोणता? कांबळे, बनसोडे, जोगदंड, वाघमारे, म्हस्के, अशा आडनावाचा.’

युनिवर्सिटीच्या, कॉलेजच्या निवडणुकांत सुषमाताई भाग घेत होत्या. याचवेळी त्यांची ओळख लक्ष्मण माने यांच्याशी ओळख झाली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते लातूरला आले होते. त्यांच्या भटक्या विमुक्तांच्या कामाबद्दल सुषमाताईंना कळलं. त्या स्वतः भटक्या विमुक्त समुदायातल्या होत्या. त्या त्यात सामील झाल्या. या समाजाचा निवाऱ्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, त्यांचं नागरीकरण, जातीचे दाखले, जात पंचायतींना विरोध, अशा अनेक चळवळींचं नेतृत्व सुषमाताईंनी केलं.

सुषमाताई सांगतात, ‘आम्हा भटक्यांना आमची ओळख नाही. दलितांना निदान गावाच्या बाहेर जागा असते. आम्ही फिरतीवर राहतो. दर ९० दिवसांनी आम्ही गाव सोडतो. आम्ही बिनचेहऱ्याची माणसं आहोत. ‘गावात गेलं तर घर नाही, वेशीवर गेलं तर शेत नाही’ अशी या भटक्या विमुक्तांची अवस्था असते. म्हणून माझ्या समुदायाला वर आणण्यासाठी काय करता येईल हे त्यावेळी माझ्यासाठी महत्त्वाचं होतं.`

हेही वाचा : जागतिक महिला दिन ८ मार्चलाच का साजरा केला जातो?

जात कळली आणि माणूसपण पुसलं

सुषमाताई बीएला असताना किशोर शांताबाई काळे यांचं कोल्ह्याट्याचं पोर हे आत्मचरित्र प्रकाशित झालं होता. हॉस्टेलवरच्या मुलींनी हे पुस्तक सुषमाताईंच्या बॅगेत पाहिलं. त्यावरून एकच गदारोळ माजला. कोल्हाटी समाजातल्या पोरीसोबत आम्ही कसं रहायचं, असं तिथल्या मुलींना वाटू लागलं होतं. जात समोर आली आणि त्याच मिनिटाला हॉस्टेलच्या मुलींच्या मनात त्यांचं माणूस असणं पुसून गेलं होतं.

‘जातव्यवस्थेत आमचा समुदाय अस्पृश्य मानला जात नाही. त्यामुळे गावचे पाटील वगैरे आमच्याशी खूप चांगलं बोलतात. याच कारणामुळे माझा समाज कधी जात व्यवस्थेच्या विरोधात बोलत नाहीत. त्यामुळेच आमच्या समाजातलं कुणीही धर्म सोडण्याची भाषा करत नाही.’ असं सुषमाताई सांगतात. घरातल्या अशा वातावरणामुळे सुषमाताईंनाही जातीमुळे होणाऱ्या शोषणाची जाणीव नव्हती.

हिंदू धर्मात जन्मले, पण मरणार नाही

नव्या विचारांमुळे घरच्यांसोबत खटके उडू लागले. मुलीनं आपली परंपरा जपावी असं घरच्यांना वाटत होतं. उलट सुषमाताईंना शिकायची, काहीतरी करून दाखवायची आस होती. म्हणून त्या घरातून बाहेर पडल्या आणि लातूरला एका मित्राच्या घरी जाऊन राहू लागल्या. त्याचं घर आंबेडकरी विचारांचं होतं.

त्याच्या घरी सुषमाताईंनी पहिल्यांदा भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हे बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं आणि त्या भारावून गेल्या. मित्राने महात्मा फुलेंचं गुलामगिरी आणि बाबासाहेबांचं शुद्र कोण होते ही दोन पुस्तकं वाचायला दिली. जातव्यवस्थेच्या विरोधातली ही पुस्तक वाचल्यावर सुषमाताईंनी ठरवलं. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी या धर्मात मरायचं नाही.

‘हिंदूंशी किंवा हिंदू धर्माशी माझं काही वाक़डं नाही. हिंदू धर्मानं आपली जातव्यवस्था सोडून दिली, तर मी हिंदू धर्मात राहीन असं खुद्द बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,’ असं सुषमाताई आवर्जून सांगतात. हिंदू धर्म जातव्यवस्था सोडायला तयार नव्हता म्हणून त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारायचं ठरवलं.

हेही वाचा : आपले आमदार महिलांविषयी सात तास काय बोलत होते?

चलो बुद्ध की ओर

यासाठी मला कुणाच्या तरी मदतीची गरज होती. त्यावेळी ऍडवोकेट एकनाथ आव्हाड आणि लक्ष्मण माने माझ्यासोबत उभे राहिले. गावागावात जाऊन बुद्ध धम्माविषयी भाषणं द्यायची, असं आम्ही ठरवलं. ‘चलो बुद्ध की ओर’ हे ३५६ दिवासांचं अभियान राबवलं. बाबासाहेबांनी दीक्षा घेतलेल्या नागपूरच्या भूमीवरच २ ऑक्टोबर २००६ ला सुषमाताईंनी बुद्धधम्माची दीक्षा घेतली.

या अभियानासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात प्रवास केला. सुषमा अंधारे हे नाव चार लोक ओळखू लागले. त्याच दरम्यान योगेश लोखंडे या कार्यकर्त्यानं संविधान दिनाच्या निमित्तानं नाशिकला एक कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात सुषमाताईंनी राज ठाकरेंचं दोन समुदायांमधे द्वेष पसरवणं संविधानाच्या विरोधी असल्याची टीका केली.

आणि भाषण वायरल झालं

या भाषणाचा वीडियो जोरदार यूट्युबवरून जोरदार वायरल झाला. त्यावरून मनसेच्या लोकांनी सुषमाताईंना ट्रोल करणं चालू केलं. सुषमाताईंनी मनसेच्या मुजोरीविरोधात सभा घ्यायचं ठरवलं. कोणत्याही मीडियाला न सांगता, कसलीही पत्रकार परिषद न घेता, जाहिरात न करता त्या सभेला हजारो लोक उपस्थित राहिले. त्यानंतर सुषमा अंधारे हे वादळ काय आहे, याची कल्पना राजकीय पक्षांना येऊ लागली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या राजकीय पक्षांनी त्यांना पक्षात येण्याचा प्रस्ताव दिला. पण त्यांचा या सगळ्याच पक्षांना विरोध होता.

या सगळ्या पक्षातला एक समान धागा म्हणजे इथं प्रस्थापित पक्षांमधे दुसऱ्या फळीचं नेतृत्व उभं होतं. पण विस्थापितांच्या पक्षात असं नेतृत्व नव्हतं. अशा विस्थापितांच्या राज्याबाहेरच्या नेतृत्वाचं इथे स्वागत होतं. इथे कन्हय्याकुमार आला, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आले. हे नेतृत्व भाषणं देणार, टाळ्या मिळवणार आणि परत जाणार.

पण महाराष्ट्राच्या मातीतून कुणी पुढे आलं तर ते इथे पाय रोवून थांबणार, म्हणून असं नेतृत्व विस्थापितांमधले प्रस्थापित पुढे येऊ देत नाहीत. त्यामुळेच इथलं नेतृत्व पुढे आलं पाहिजे, भाजपला विरोध करायचा आणि मतांचं ध्रुवीकरण नको या तीन मुद्दायांवर लढायचं सुषमाताईंनी ठरवलं.

राजा मतपेटीतून आला पाहिजे

यातूनच गणराज्य संघाची स्थापना झाली. राजा राजाच्या पोटी नाही तर राजा मतपेटीतून आला पाहिजे, ही टॅगलाईन घेऊन गणराज्यची स्थापना झाली. ‘कोणत्याही प्रकारच्या वर्चस्ववादाला माझा नकार आहे. मग ती प्रकाश आंबेडकरांची असो किंवा उदयनराजेंची असो. गणराज्य कुठल्याच हायरारकीला साथ देत नाही,’ असं सुषमाताई सांगतात.

दादरच्या आंबेडकर भवनाची इमारत पाडण्यावरून वाद झाला, तेव्हा प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारे यांच्यात संघर्षाला सुरवात झाली. पुढे वंचित बहुजना आघाडीला शह देण्यासाठी गणराज्य संघ सुरू झाल्याचा आरोप झाला. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांपेक्षाही सुषमा अंधारेंना ट्रोल केलं ते वंचितच्या कार्यकर्त्यांनी. पण सुषमाताई त्यालाही पुरून उरल्या.

त्या म्हणतात, त्यांचा गणराज्य संघ हेही एक सामाजिक व्यासपीठ आहे. हा संघ एखाद्या दबावगटासारखं काम करतो. ‘आम्ही आज महाविकास आघाडीच्या मित्रयादीत जरूर आहोत. पण मी कुठल्याही राजकीय पक्षाची सदस्य नाही,’ त्या राजकारणात नसूनही राजकारण करणाऱ्या त्या राजकारणी ठरल्यात.

हेही वाचा : दिल्लीवाली आतिशी: सावित्रीमाईलाही वाटलं असतं हीच माझी लेक

आंबेडकरी चळवळीनं बाईला ताई बनवलं

‘आंबेडकरी चळवळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही चळवळ आपल्याला समृद्ध करते. पॉश बिल्डिंगमधे राहणारा माणूस बाबासाहेबांच्या जयंतीला आत्मीयतेनं हार, फुलं आणतो. तितकीच आत्मीयता गरीब, कष्टकरी माणसाच्या मनातही असते. बाबासाहेबांना, बुद्धाला मनात ठेवणाऱ्या माणसांना आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आपल्या हृदयात स्थान देतात. मुख्य म्हणजे इतर कोणत्याही चळवळीपेक्षा जास्त अभ्यासू आणि चिकित्सक माणसं आंबेडकरी चळवळीत भेटतात.’

सुषमाताईंच्या समाजात बाईची ओळख ही फक्त एक ‘बाई’ म्हणून असते. नाचणाऱ्या बायकांना ‘बाई’ म्हणून बोलावलं जातं. पण या आंबेडकरी चळवळीनं आपल्याला बाईपासून ताई बनवलं, याचा सुषमाताईंना सार्थ अभिमान वाटतो.

हाच खरा पुरस्कार

आज सुषमाताई राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापिका आहेत. शिवाय तडाखेबंद वक्त्या, स्त्रीवादी कार्यकर्त्या, लेखिका, कवयित्री असाही त्यांचा परिचय आहे. मनुवादी विचारांचा पंचनामा हे त्यांचं भाषण ऐकून तर आपल्याला कुणीतरी खाडकन झोपेतून जागं केलंय असा भास होतो. त्यांच्या एकेका वीडियोला लाखो व्यूज आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत, पण खरी पावती कोणती असं विचारलं तर त्या एक आठवण सांगतात.

कर्नाटकातल्या सौंदत्तीजवळच्या दत्तवाडी गावात प्रत्येक घरात एक जोगतीण होती. देवीच्या मूर्ती घेऊन गावोगाव जोगवा मागायचा, हे त्यांचं काम. या गावात धम्मदीप कार्यक्रमात ताई बौद्ध धम्माविषयी बोलल्या. रात्री कार्यक्रम झाल्यावर गावातल्या सगळ्या बायकांनी सुषमाताईंना थांबायचा खूप आग्रह केला. त्यांच्या आग्रहाला मान देत सुषमाताई राहिल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सगळ्या बायका एकत्र आल्या. अतिशय सन्मानपूर्वक त्यांनी आपापल्या घरातल्या पारंपरिक मुर्ती आणल्या. त्या सगळ्या मुर्ती एकत्र वितळवल्या. त्यातून बुद्धाची एक मुर्ती घडवली आणि त्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या दिवसानंतर त्या सगळ्या जोगतिणींनी जोगवा मागणं सोडलं. सुषमाताई सांगतात तोच माझा सगळ्यात मोठा पुरस्कार होता.

हेही वाचा : 

मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!

लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

आता बायकांचा लढा युद्धभूमीवरच्या समानतेसाठी!

लवमंत्रः मुलीने दिलेला प्रेमाचा नकार मुलानं कसा पचवावा?